माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 27 June 2018

वटवृक्ष आणि पर्यावरण

   वटवृक्षाची पाने मोठी, आकार मोठा, घेर
मोठा. या सर्वांचे पर्यावरणात महत्त्वही मोठं.
तो वृक्ष दीर्घायुषी असतो. त्याच्या पानावर
रंध्रेही जास्त असतात. रंध्रांतून कर्बद्विवायू
घेतला जातो. बाहेर प्राणवायू टाकला जातो.
प्राणवायू जास्त असतो. हा प्राणवायू हवेतील
विषारी वायूंची तीव्रता कमी करतो.पर्यावरणाला
बाधा ठरणाऱ्या कर्बद्विवायुचे शोषण ही पानं
करतात. प्राणवायूमुळे हवा शुध्द होते. ही शुध्द
हवा त्याच्यावर राहणाऱ्या पाखरांना, कीटकांना
मिळते. झाडाखालच्या मुशाफिराला मिळते.
   वटवृक्षाची हवाशुध्दी :- वटवृक्षाच्या एका
शास्त्रीय पाहणीत असे दिसले की, एक मोठे
वडाचे झाड दररोज २ टन पाणी बाहेर फेकते.
हे पाणी बाष्परूपात असते. त्याचे ढग बनतात.
हा वृक्ष ६.८८ टन लाकूड तयार करण्याला
१०.१६ मि. मी. पावसाची गरज असते. ज्या
वटवृक्षाची छाया १६० चौ. मी. आहे. त्या
वृक्षाची पाने जमिनीवर पसरली तर त्याचे
क्षेत्रफळ १० हेक्टर भरेल. हे वडाचे झाड
तासाला  ७१२ किलो एवढा प्रचंड प्राणवायू
हवेत सोडतो. त्यामुळे हजारो जीव श्वसन
करतात. तसेच घातक कर्बद्विवायू हा वृक्ष
ग्रहण करतो.
      गुजरातेतील एक प्रचंड वटवृक्ष आहे.
त्याखाली बसून कबीराने दोहे रचले. तो
भडोचपासून १५ - १६ किलोमीटर अंतरावर
आहे. त्याचा घेरा २००० चौ. फूट असून
एकावेळी ५०००  लोक त्याच्याखाली बसू
शकतात.
  वटवृक्ष- पक्ष्यांचे आश्रयस्थान :- अनेक वर्षे
जगणारा, अनेक पारंब्याचा हा वृक्ष अनादि
काळापासून प्रसिद्ध आहे. पूर्वी त्याचा उपयोग
घरे बांधण्यासाठी, आसरा म्हणून करीत. त्याची
पाने अंगाला लपेटत. जळणाचे लाकूड
त्यापासून मिळे. अनेक फांद्यांवर अनेक पक्ष्यांची
घरटी असतात. उंच भरा-या मारणारा गरूडही
येथे राहतो तर चिमुकल्या जीवाच्या चिमण्याही
यावर राहतात.
     वडाच्या या असंख्य उपकाराची फेड
करण्यासाठी त्याची आपण पूजा करतो.
पूजा करताना अनायासे पाणी देणे,
संरक्षणासाठी पार बांधणे. खत टाकणे या
क्रिया येतात. झाड चांगले वाढते. अधिक काळ
टिकते.  पर्यावरणाची शुध्दी करते.
  वटपौर्णिमेच्या निमित्ताने या वृक्षाला माझे
शतशः प्रणाम !!"
   

 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
               केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment