माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 26 February 2025

पिकांची माहिती (पीक संवर्धन )

-- पीक संवर्धन हे एक शास्त्र असुन विविध पिकांच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून लागवड केली जाते किंवा पीक उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने पिकांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्याच्या शास्त्रास 'पीक संवर्धन 'असे म्हणतात.

✓ पिकांचे वर्गीकरण :

-- प्रामुख्याने पिकांचे वर्गीकरण हे हवामान, हंगाम, जीवनक्रम, पाणी पुरवठा, आर्थिक महत्व, उपयोग, मुळांचा प्रकार आणि वनस्पती शास्त्रीयदृष्ट्या प्रकार इत्यादीनुसार केले जाते.

अ) हवामानानुसार पिकांचे वर्गीकरण :

१) उष्ण कटीबंधीय पिके :- 
--- उष्ण हवामानात येणाऱ्या पिकांस उष्ण कटीबंधीय पिके असे म्हणतात. उदा. भात, ऊस, ज्वारी, बाजरी, मका इ.

२) शीत कटीबंधीय पिके :- 
--- ज्या पिकांना वाढीसाठी थंड हवामानाची गरज असते अशा पिकांना शीतकटीबंधीय पिके म्हणतात. - उदा. गहू, जवस, हरभरा, मोहरी, करडई इ.

✓ ब) हंगामानुसार पिकांचे वर्गीकरण :

१) खरीप पिके :--
--- जी पिके जून ते सप्टेंबर या मान्सून महिन्यांत घेतली जातात त्यांना खरीपाची पिके असे म्हणतात. उदा. कापुस, भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग इ.

२) रबी पिके :-
--- ही पिके ऑक्टोबर ते फेब्रुवारी या हिवाळी महिन्यांत घेतली जातात त्यांना रबीची पिके असे म्हणतात. उदा. गहू, हरभरा, करडई.

३) उन्हाळी पिके :-
 --- ही पिके मार्च ते मे या उन्हाळी महिन्यांत घेतली जातात. उदा. उन्हाळी भुईमूग, कलिंगड, भोपळा, काकडी इ.
=======================

✓ क) पिकांच्या जीवनक्रमानुसार वर्गीकरण :

१) हंगामी पिके : --
--- ज्या पिकांना जीवनक्रम पूर्ण होण्याकरीता एक हंगाम लागतो त्यांना हंगामी पिके असे म्हणतात. उदा. भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग इ.

२) द्वि हंगामी पिके : -
--- या पिकांना आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी दोन हंगामाची आवश्यकता असते. पहिल्या हंगामात अशा पिकांची शाखीय वाढ होते तर दुसऱ्या हंगामात फुले व फळे येवून जीवनक्रम पूर्ण करतात त्यांना द्वि हंगामी पिके असे म्हणतात. उदा. हळद, आले इ.

३) वार्षिक पिके :-
---  जी पिके आपला जीवनक्रम एका वर्षात पूर्ण करतात त्यांना वार्षिक पिके असे म्हणतात. उदा. ऊस

४) द्वि वार्षिक पिके :- 
--- ज्या पिकांना वाढीसाठी आणि फुले, फळे येण्याकरिता दोन वर्षाचा कालावधी लागतो त्यांना द्वि वार्षिक पिके असे म्हणतात. पहिल्या वर्षी अशा पिकांची शाखीय वाढ होते आणि दुसऱ्या वर्षी फुले व फळे येवून जीवनक्रम पूर्ण करतात. उदा. केळी, पपई इ.

५) बहुवार्षीक पिके :-
--- जी पिके वर्षानुवर्षे शेतात जगतात त्यांना बहुवार्षीक पिके असे म्हणतात. उदा. आंबा, पेरू इ.
========================

✓ ड) पाणी पुरवठ्याच्या स्त्रोतावरून पिकांचे वर्गीकरण :

१) जिरायती पिके :-
--- जी पिके पावसाच्या पाण्यावर येतात त्यांना जिरायती पिके असे म्हणतात. उदा. भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका इ.

२) बागायती पिके :-
--- जी पिके पावसाळ्या व्यतिरीक्त पाणी देवून घेतात त्यांना बागायती पिके असे म्हणतात उदा. ऊस, कांदा, कोबी, टोमॅटो, केळी इ.
======================

इ) आर्थिक महत्वानुसार पिकांचे वर्गीकरण :-

१) नगदी पिके : -
--- जी पिके जास्तीत जास्त आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने घेतली जातात त्यांना नगदी पिके म्हणतात. उदा. कापूस, ऊस, तंबाखू, इ.

२) अन्नधान्य पिके : -
--- जी पिके मानवाला अन्न व गुरांना चारा मिळावा या उद्देशाने घेतली जातात त्यांना अन्नधान्य पिके असे म्हणतात. उदा. ज्वारी, भात, गहू, मका इ.
========================

✓ फ) पिकांची उपयोगावरून वर्गवारी :-

१) तृणधान्य पिके :-
--- जी पिके अन्नधान्य म्हणून वापरतात आणि त्यांच्यामध्ये पिष्टमय पदार्थ असतात, बी एकदल असते अशा पिकांना तृणधान्याची पिके म्हणतात. उदा. भात, गहू, ज्वारी, मका, नाचणी इ.

२) कडधान्य पिके :-
--- ज्या पिकांच्या बिया द्विदल असतात, त्यांचा उपयोग प्रामुख्याणे डाळ तयार करण्यासाठी केला जातो त्यांना कडधान्य पिके असे म्हणतात. उदा. हरभरा, तूर, वाल, मटकी, हुलगा इ.

३) गळीताची पिकेः-
--- ज्या पिकांपासून तेल काढले जाते त्यांना गळीताची पिके म्हणतात. उदा. भुईमूग, करडई, जवस इ.

४) वैरणीची पिके :-
--- ज्या पिकांचा जनावरांना चारा म्हणून उपयोग केला जातो त्यास वैरणीची पिके म्हणतात. उदा. ज्वारी, लसूण घास, बरसीम, मका, गिनीगवत, नेपियर गवत इ.

५) साखरेची पिके :-
--- ज्या पिकांचा उपयोग साखर तयार करण्यासाठी होतो त्यांना साखरीची पिके असे म्हणतात. उदा. ऊस, बीट इ.

६) वाखाची पिके:-
---  ज्या पिकांपासून वाख मिळवतात त्यांना वाखाची / तंतुमय पिके म्हणतात. उदा. कापूस, आंबाडी, घायपात, ताग, ज्यूट इ.

७) पिष्टमय पिके :-
--- ज्या पिकांपासून तवकिलासारखे पीठ तयार होते त्यांना पिष्टमय पिके म्हणतात. उदा. रताळी, टेंटॅपीओका इ.


८) मसाल्याची पिके :--
--- ज्या पिकांचा उपयोग मसाला म्हणून केला जातो त्यांना मसाल्याची पिके म्हणतात. उदा. जिरे, धणे, मेथी, मिरची, आले, हळद इ.

९) कैफाची पिके :-
--- ज्या पिकांपासून उत्तेजक पदार्थ तयार केले जातात त्यांना कैफाची पिके म्हणतात. उदा. तंबाखू, भांग, अफू, गांजा इ.

१०) भाजीपाला पिके :-
--- अ) फळ भाज्या ज्या पिकांच्या फळांचा उपयोग भाजी करण्यासाठी केला जातो त्यांना फळ भाज्या म्हणतात. उदा. वांगी, टोमॅटो इ. ब) पालेभाज्या ज्या पिकांच्या पानांचा उपयोग भाजी करण्यासाठी करतात त्यांना पालेभाज्या म्हणतात. उदा. पालक, मेथी, पोकळा इ.

११) हिरवळीच्या खताची पिके :-
---- ज्या पिकांचा उपयोग जमिनींचे गुणधर्म सुधारण्यासाठी हिरवे असतांना जमिनीत गाडले जातात त्यांना हिरवळीच्या खताची पिके म्हणतात. उदा. धैंचा, ताग, गिरीपुष्प इ.

१२) मुळ पिके :-
--- ज्या पिकांची मुळे भाजी अथवा सॅलेड म्हणून उपयोग होतो त्यांना मुळ पिके असे म्हणतात गाजर, मुळा इ.
===========================
संकलन:- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment