माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 12 April 2023

वनस्पतीचे उपयोग


(१) कोरफड 
---- कोरफड ही औषधी वनस्पती आहे. निरनिराळ्या त्वचारोगांवर आणि भाजणे, कापणे अशा जखमांवर कोरफड अत्यंत गुणकारी असते. कोरफडीच्या रसाने पचनसंस्थेचे विकार दूर होतात. मधुमेह आणि कॅन्सरच्या उपचारांत कोरफडीचा वापर केला जातो. सौंदर्यप्रसाधनातही कोरफडीच्या जेलचा उपयोग करतात.
-------------------------------
(२) हळद 
---- हळद ही स्वयंपाकात रोजच वापरली जाते. हळदीला अनेक औषधी गुणधर्मही आहेत. जखमा भरून काढणे व जंतुनाशकासारखे कार्य करणे या गुणधर्मांमुळे हळदीचा वापर काही औषधांत केला जातो. सौंदर्यप्रसाधनातही हळद वापरली जाते. खोकला व सर्दीच्या विकारात हळदीची पूड घातलेल्या दुधाचे सेवन केल्यास लाभदायक ठरते.
-------------------------------
(३) तुळस 
---- तुळस ही औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या पानांच्या रसाने निरनिराळे विकार बरे होतात. तुळस ही कीटकांना दूर ठेवणारी वनस्पती आहे. जुन्या काळी प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असे. तुळशीच्या वाळलेल्या खोडापासून तुळशी माळा बनवल्या जातात. आयुर्वेदात तुळशीपासून अनेक औषधे बनवली जातात. थायलंडच्या काही खाद्यपदार्थात तुळशीच्या पानांचा वापर होतो. 'कर्पूर तुळशी' या तुळशीच्या जातीपासून तेलाची निर्मिती करण्यात येते.
-------------------------------
(४) करंज 
---- करंजाच्या वृक्षापासून तेल तयार करतात. अनेक विकारांवर गुणकारी असलेली आयुर्वेदिक : औषधे ही करंजाच्या झाडापासून किंवा बियांपासून तयार करतात. करंजाच्या झाडाची फळे, पाने, मुळे, खोडाची साल, बिया, डहाळ्या आणि बियांपासून बनवलेले तेल या सर्वांपासून निरनिराळी औषधे तयार करण्यात येतात. बायोडिझेलची निर्मितीदेखील करंजापासून करण्यात येते.
-------------------------------
(५) मोह 
 ---- मोहाचे वृक्ष आदिवासी भागात जंगल प्रदेशांत आढळून येतात. मोहाची फुले आणि बिया यांच्यापासून औषधे व इतर द्रवे तयार करण्यात येतात. मोहाच्या तेलाचा वापर डोकेदुखी, त्वचाविकार आणि संधिवात या विकारांवर केला जातो. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात मोहाच्या फुलांपासून जॅम बनवला जातो.
आदिवासी स्त्री-पुरुषांत मोहाची दारू लोकप्रिय आहे.
------------------------------
(६) द्राक्ष 
---- द्राक्ष हे लोकप्रिय फळ आहे. ही वनस्पती वेलींच्या प्रकारात
आहे.  बिनबियांच्या द्राक्ष उत्पादनाने महाराष्ट्रात सर्वांना द्राक्षे मिळू लागली. द्राक्षे ताज्या स्वरूपात खाल्ली जातात. द्राक्षे वाळवून त्यांचे बेदाणे करतात. द्राक्षापासून औषधी द्राक्षासवही बनवण्यात येते. 'वाईन' चे उत्पादनदेखील द्राक्षांपासून होते.
-------------------------------
(७) आले 
---- आले स्वयंपाकात वापरले जाते. तसेच त्याचा औषध म्हणूनही उपयोग होतो. ताज्या आल्यार रस पोटाच्या अनेक प्रकारच्या तक्रारींसाठी घेतला जातो. सुकवलेल्या आल्याला 'सुंठ' म्हणतात सुंठीचा औषध म्हणून उपयोग होतो. डोकेदुखी, मळमळणे, पित्तविकार अशांवर घरगुती उपचार म्हणू नेहमीच आले व सुंठीचा उपयोग होतो.
-------------------------------
(८) आंबा 
---- आंबा या ग्रीष्म ऋतूत येणाऱ्या फळाला, 'फळांचा राजा' म्हणतात. आंब्यात मोठ्या प्रमाणात 'अ' जीवनसत्व आणि शर्करा असते. (आंब्यापासून आमरस, जॅम, लोणची, सरबत अशी विविध उत्पादनेदेखील तयार करतात) आंब्याच्या पानांना 
मंगलप्रसंगी महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक मंगलप्रसंगी व तोरणांमध्ये आंब्याच्या झाडाची पाने वापरली जातात.
-------------------------------
(९) निलगिरी 
---- निलगिरीची वाळलेली पाने आणि निलगिरीपासून बनवलेले तेल या दोन्हींचा उत्तम औषध म्हणून वापर होतो. सर्दी-ताप यांवर निलगिरी तेलाचा रामबाण उपाय होतो. स्वच्छतेसाठीही निलगिरी तेल वापरले जाते. दुर्गंधी दूर करण्यासाठी निलगिरीचा वापर होतो. निलगिरीच्या वृक्षाचे लाकूडही उपयुक्त असते. खोडापासून कागदही बनवतात.
-------------------------------
(१०) बाभूळ 
---- बाभळीच्या पानांचा व शेंगांचा जनावरांना खाद्य म्हणून वापर करण्यात येतो. बाभळीच्या कोवळ्या फांदयांपासून दात घासण्यासाठी काड्या बनवण्यात येतात. बाभळीच्या फांदयांवरील काट्यांमुळे कुंपणासाठी त्याचा वापर होतो. बाभळीच्या खोडापासून स्रवणाऱ्या गोंदाला बरीच मागणी असते. बाभळीचे लाकूड अतिशय टणक असल्याने बोटबांधणीसाठी त्याचा वापर केला जातो. 
-------------------------------
(११) साग 
---- सागाच्या लाकडाचा फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असते. घरांच्या बांधणीत आणि खिडक्या दारे बनवण्यासाठी सागाचे लाकूड लागते. ही मागणी पुरवण्यासाठी भारतीय वन खाते सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करीत असते.
-------------------------------
(१२) पालक 
---- पालक ही पालेभाजी फारच लोकप्रिय आहे. यात अनेक जीवनसत्त्वे व खनिजे असतात. शरीराच्या अनेक तक्रारी दूर करायच्या असतील; तर नियमितपणे पालकाचे सेवन करणे फायदयाचे असते. पालक बुद्धिवर्धक आणि हृदयाचे आरोग्य जपणारी भाजी आहे. बद्धकोष्ठावर पालक परिणामकारक ठरतो.
=====================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment