(१) डोक्यावर तुरा छान
राष्ट्रीय पक्षांचा मला मान !
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- मोर
-------------------------------------
(२) मी उमलते दलदल चिखलात,
राष्ट्रीय फुलाचा मिळे मान भारतात.
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- कमळ
---------------------------------------
(३) उंचच उंच माझी मान,
झाडाच्या शेंड्यांची मी पाने खातो छान !
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- जिराफ
-------------------------------------
(४) बत्तीस जणांना ठेवते गुपचूप ,
स्वतः बोलते खूपच खूप !
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- जीभ
-------------------------------------
(५) सर्वात मोठे माझे पान,
पंगतीमध्ये मजला मान !
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- केळीचे पान
------------------------------------
(६) चिव चिव करिते गुजगोष्टी ,
खट्याळ आहे ही मोठी !
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- चिमणी
---------------------------------------
(७) म्हणतात मला फळांचा राजा,
खाल्ल्यावर वाटते मज्जाच मजा !
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- आंबा
--------------------------------------
(८) वाघाची ही मावशी ,
चोरून पिते दूध कशी !
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- मांजर
-------------------------------------
(९) चाक फिरवतो गरागरा ,
मडकी करतो भराभरा !
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- कुंभार
------------------------------------
(१०) पत्ता शोधतो, पत्र वाटतो,
सकाळ असो की संध्याकाळ .
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- पोस्टमन
-------------------------------------
(११) बत्तीस जणांना ठेवते गुपचूप
स्वत: बोलते खूपच खूप
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- जीभ
----------------------------------
(१२) लाकूड कापतो, लाकूड तासतो
औत, गाडी करून देतो
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- सुतार
----------------------------------
(१३) एका पासूनी बारा इतकी असते याची धाव
भिंतीवरती, हाती शोभे आठवते का नाव?
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- घड्याळ
----------------------------------
(१४) सोने घेतो, चांदी घेतो,
दागदागिने करून देतो
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- सोनार
------------------------------------
(१५) म्हणतात मला फळांचा राजा
खाल्ल्यावर वाटते मज्जाच मजा
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- आंबा
-------------------------------------
(१६) सुपासारखे माझे कान
शेपूट आहे फार लहान
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- हत्ती
-------------------------------------
(१७) इटुकलं पिटुकलं दाराला लटकलं
चावी शिरता पोटात, पटकन उघडलं
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- कुलूप
--------------------------------------
(१८) मी आहे जंगलाचा राजा,
चाल तर ऐटबाज,
आयाळ माझी शान,
चटकन तू जाण !
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- सिंह
------------------------------------------
(१९) दरवर्षी बदलतो पाने,
पारंब्यांवर मुले खेळती,
पक्षांना देतो आधार,
धरतो तुम्हावर छाया.
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- वडाचे झाड
------------------------------------------
(२०) शेताची, घराची करतो राखण,
प्रामाणिक म्हणून माझी शान,
वास, आवाजावरून ओळखतो,
मिश्राहार घेतो
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- कुत्रा
------------------------------------------
(२१) नाही दिसत डोळ्यांना,
नाही लागत हाताला !
आहे आजूबाजूला सर्वत्र,
ओळखा पाहू मला.
उत्तर -- हवा
------------------------------------------
(२२) नाहीत पाय, नाहीत हात,
तरी पळतो वेगाने
पाहून मजला भितात लोक,
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- साप
~~~~~~~~~~~~~~~~~~
(२३) जमिनीवर असतो,
पाण्यातही राहतो,
डराव डराव ओरडतो,
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर : बेडूक.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
(२४) रंग माझा काळा
गोड माझा गळा
कुहूकुहू गाणे माझे
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- कोकिळ
~~~~~~~~~~~~~~
(२५) सुपासारखे माझे कान,
शेपूट आहे फार लहान
पाने, ऊस माझे जेवण,
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर : हत्ती.
~~~~~~~~~~~~~~
(२६) उंचाडी मान, फत्ताडे पाय
वाकडी पाठ, डुगडुग जाय
तुडवीत जातो वाळवंट
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर : उंट.
~~~~~~~~~~~~~~~
(२७) हिरवे हिरवे अंग माझे
लाल लाल चोच माझी
विठू विठू बोल माझे
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- पोपट
~~~~~~~~~~~~~~~
(२८) मला म्हणतात मनीमाऊ
शरीर माझे मऊ मऊ
मी करते म्यँव म्यँव
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- मांजर
~~~~~~~~~~~~~~~
(२९) कात नाही, चुना नाही,
तोंड कसे रंगले ?
पाऊस नाही, पाणी नाही,
रान कसे हिरवे?
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर : पोपट.
~~~~~~~~~~~~~~~
(३०) लांब चोच, लांब मान.
पांढरा रंग , लावतो ध्यान
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर : बगळा.
~~~~~~~~~~~~~~~
(३१) समुद्रकिनारी राहतो,
उंच उंच वाढतो,
शुभकार्यात माझ्या फळाला
फारच मान मिळतो.
मी कोण ?
उत्तर -- नारळाचे झाड
~~~~~~~~~~~~~~~
(३२)झाडावर राहतो,
वसंतात गातो,
काळा जरी मी
आनंद पसरवतो.
मी कोण ?
उत्तर -- कोकीळ
~~~~~~~~~~~~~~~~
(३३) डोंगरावरून येते,
सदैव धावते,
शेते आणि माणसांना
उपयोगी पडते.
मी कोण ?
उत्तर -- नदी
~~~~~~~~~~~~~~~~~~
(३४)माझ्या पानांचे तोरण करतात,
फुलांना 'मोहोर' म्हणतात,
सुमधुर फळांची सर्वच
वाहव्वा करतात.
मी कोण ?
उत्तर -- आंब्याचे झाड
~~~~~~~~~~~~~~~~~~
(३५) झाडांना मी आधार देतो.
क्षार व पाणी शोषून घेतो.
त्यांना खोडाकडे मी पाठवतो.
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- मूळ
~~~~~~~~~~~~~~~~~~
(३६) वनस्पतींना देतो आकार
पानाफुलांना देतो आधार
सर्वांना पोहचवितो पाणी व क्षार
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- खोड
~~~~~~~~~~~~~~~~~
(३७) रंग माझा हिरवा हिरवा
माझ्यात आहेत हिरवे कण
करतो तयार वनस्पतींचे अन्न
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- पान
~~~~~~~~~~~~~~~~~~
(३८) त-हेत-हेचे रंग मजेचे
वेगवेगळ्या आकाराचे आणि सुगंधाचे
म्हणून देवालाही आवडतो आम्ही
फळांना जन्म देतो आम्ही
ओळखा पाहू आम्ही कोण ?
उत्तर -- फूल
~~~~~~~~~~~~~~~~~~
(३९) मी काळा, पिवळा कीटक आहे.
मी मध गोळा करते. तुम्ही मला त्रास दिलात,
तर मी तुम्हांला दंश करीन.
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- मधमाशी
~~~~~~~~~~~~~~~~~
(४०) आहोत आम्ही शेजारी,
भेट नाही संसारी .
रंग विविधता दाखवतो,
निसर्ग तुम्हा दावितो.
ओळखा पाहू कोण ?
उत्तर --- डोळे
~~~~~~~~~~~~~~~~~
(४१) सुगंध येता मन बहरते,
दुर्गंधीने मी होतो नाराज.
फळ - फुलांची आवड मजला,
वासाची मी करतो पारख.
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- नाक
~~~~~~~~~~~~~~~~~
(४२) इवली इवली छान सोनुली,
कडू, आंबट, गोड, तिखट, सांगे तुम्हां
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर -- जीभ
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६