माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 7 January 2019

चला आपण किल्ल्यांविषयी माहिती घेऊया.

   प्राचीन काळापासून किल्ले बांधण्याची प्रथा चालत आलेली दिसून येते.

 ● (अ)  किल्ल्यांचे महत्त्व :-
    किल्ल्यांमुळे शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण
करणे सोपे जात असे. राज्य सुरक्षित राहत असे.
किल्ल्यांमुळे सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण
ठेवणे शक्य  होत असे. आधुनिक काळात
किल्ले बांधले जात नाहीत; पण असलेल्या
प्राचीन किल्ल्यांचा विविध कारणांसाठी वापर
केला जातो. पर्यटनस्थळ म्हणून किल्ल्यांचा
मुख्य उपयोग केला जातो.

● (आ) किल्ल्यांचे प्रकार :-
        किल्ला ही वास्तू कोठे उभारली आहे.
त्यावरून किल्ल्यांचे प्रकार पडतात.

 (१) गिरीदुर्ग  किंवा डोंगरी किल्ले :-
        उंच डोंगराच्या पठारावर पाण्याची सोय
पाहून बांधलेल्या किल्ल्यांना  ' डोंगरी किल्ले '
म्हणतात. डोंगरी किल्ले विशेषत्वाने महाराष्ट्रात
आढळतात. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बांधण्यात
आलेले रायगड, राजगड, प्रतापगड इत्यादी
डोंगरी किल्ले होत. मध्यप्रदेशातील मांडवगड,
आंध्रप्रदेशातील गोवळकोंडा, राजस्थानातील
जेसलमेर, चित्तोड हेही डोंगरी किल्ले होत.

 (२) भूईकोट किल्ला  :-
       खंदकाने वेढलेल्या व जमिनीवर बांधलेल्या
किल्ल्यांना  ' भुईकोट किल्ला ' असे म्हणतात.
अशा किल्ल्यांना सुरक्षिततेसाठी तटबंदीही
बांधलेली आढळते. आग्र्याच्या आणि दिल्लीचा
लाल किल्ला, फत्तेपूर सिकरी येथे अकबराने
बांधलेला किल्ला, राजस्थानमधील उदयपूर,
जयपूर, जोधपूर येथील किल्ले, महाराष्ट्रातील
नळदुर्ग, परांडा, अहमदनगर येथील किल्ले,
तसेच कर्नाटकातील विजापूर येथील किल्ला
हे भुईकोट किल्ले होत.

  (३) जंजिरा व जलदुर्ग  :-
       ' जंजिरा ' म्हणजे समुद्रातील खडकावर
बांधलेला व चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला
किल्ला होय. सिंधुदुर्ग, मुरूडजवळील जंजिरा,
अलिबागचा कुलाबा किल्ला, अर्नाळा, सुवर्णदुर्ग
हे जंजिरा प्रकारातील किल्ले होत.
    तर तिन्ही बाजूंनी समुद्र आणि एका बाजूने
जमिन असणाऱ्या किल्ल्यांना  ' जलदुर्ग '
म्हणतात. वसईचा किल्ला, विजयदुर्ग हे
जलदुर्ग प्रकारातील किल्ले होत.

===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर  साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment