माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 22 December 2017

आपले सण (थोडक्यात माहिती)

(१) होळी --

  होळीचा सण फाल्गुन पौर्णिमेला असतो.
होळीचा सण दोन दिवस साजरा करतात.
पहिल्या दिवशी घरापुढे अंगण सारवून त्यावर
लाकडे व गोव-या रचून होळी तयार करतात.
संध्याकाळी होळी पेटवून तिची पूजा करतात.
तिला नैवेद्य अर्पण करतात. होळी म्हणजे
हुताशनी देवी आहे असे मानतात. ती होळी-
बरोबर सर्व वाईटांचा जाळून नाश करते असा
समज आहे. वर्गणी काढून सार्वजनिक होळीही
अनेक ठिकाणी साजरी करतात.
       होळीच्या दुसर्‍या दिवसाला धुलिवंदन
म्हणतात. त्या दिवशी रंग उडवून खेळ खेळतात.
दोन्ही दिवस गोडाचे जेवण करतात व आनंदाने
होळीचा सण साजरा करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(२) दिवाळी --

  आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक वद्य द्वितीया
हे पाच दिवस दिवाळी असते. या काळात
पाचही दिवस घरापुढे पणत्या लावून दिव्यांची
आरस करतात. म्हणूनच त्या सणाला दिवाळी
किंवा दीपावली असे म्हणतात. उंच ठिकाणी
आकाशकंदीलही लावतात. दाराला तोरण
बांधून दारापुढे रांगोळी काढतात.
        दिवाळीसाठी लोक नवे कपडे घेतात.
दागदागिने करतात, लाडू, करंज्या,चकल्या
वगैरे फराळाचे जिन्नस बनवतात. फळे, मिठाई
आणतात. फटाके, फुलबाज्या यांचा तर
धुमधडाका चालू असतो.
   दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज हे
दिवस महत्वाचे असतात. भाऊबिजेला बहीण
भावाला ओवाळते. ओवाळणी म्हणून भाऊ
बहिणीला साडी किंवा काही भेटवस्तू देतो.
   दिवाळी हा सण श्रीमंतांपासून गरिबांपर्यत
सर्वांचा आवडता सण आहे. आपली दुःखे
विसरून सर्वजण हा सण आनंदाने साजरा
करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(३)  नाताळ --

   नाताळ हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे.
२५ डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्म झाला.
म्हणून हा सण साजरा करतात. २४ डिसेंबर -
पासून १ जानेवारीपर्यंत नाताळ असतो.
   नाताळच्या सणासाठी लोक आपली घरे
साफसूफ करतात व सजवितात. ख्रिसमस
ट्री उभी करतात. खेळणी व विजेच्या दिव्यांच्या
माळा लावून ती सुशोभित करतात. ख्रिसमस
केक बनवितात.२४ डिसेंबरच्या मध्यरात्री लोक
चर्चमध्ये जमतात. लहान मुले झोपी जाताना
आपल्या अंथरुणांजवळ आपले रिकामे मोजे
ठेवतात. लाल कपडे घातलेला पांढरीशुभ्र दाढी
असलेला सांताक्लाॅज आपल्या मोज्यात
आपल्यासाठी बक्षीस ठेवणार अशी त्यांची
अपेक्षा असते.
   २५ डिसेंबर हा नातेवाईकांच्या गाठीभेटीचा
दिवस असतो. त्या दिवशी मित्रमंडळीना व
नातेवाईकांना शुभेच्छा देतात. भेटवस्तू देतात.
अशा प्रकारे नाताळ आनंदाने साजरा करतात
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(४) ईद --

     ईद हा मुसलमानांचा सण आहे. वर्षातून
खास रमजान ईद व बकरी  ईद या दोन ईद
ते साजऱ्या करतात.
  रमजान ईदमध्ये आकाशात चंद्राचे दर्शन
झाल्यावर मुसलमान रोजे  (उपवास)
पाळतात, आणि नमाज पढतात. हे रोजे एक
महिन्यानंतर परत चंद्राचे दर्शन झाल्यावरच
सोडतात व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर
उठून आंघोळ करून मशिदीत जातात व
नमाज पडतात.
   बकरी ईद हजरत इस्माईलच्या बलिदानाची
आठवण म्हणून साजरी करतात. दोन्ही ईदच्या
वेळी मुसलमान लोक नवे कपडे घालून
मशिदीत  जातात. व नमाज पडतात. त्यानंतर
एकमेकांना आलिंगन देऊन गाठीभेटी घेतात.
' ईद मुबारक ' म्हणून एकमेकांना शुभेच्छा
देतात. प्रत्येकाच्या घरी शीरकुरमा करतात
वे घरी आलेल्या प्रत्येक माणसाचे शीर- कुरमा
देऊन स्वागत करतात. बकरी ईदच्या दिवशी
मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात.
   थोडक्यात ईदच्या सणांमुळे प्रेम, एकात्मता
व बंधुभाव वाढीस लागतो.
============================
 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि.धुळे
              ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment