किल्ले पाहायला जाऊ, इतिहास अनुभवू !
नाशिक जिल्ह्यात जाऊ,
साल्हेर-मुल्हेर पाहू,
महाराष्ट्राचा मान उंच, डोळ्यात साठवू.
धुळे जिल्ह्यात जाऊ,
थाळनेर-सोनगीर पाहू,
तापीच्या काठचा इतिहास, मनात रुजवू.
पुणे जिल्ह्यात जाऊ,
शिवनेरी-कोंढाणा पाहू,
शिवरायांचे बालपण, आम्ही आठवू.
अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊ,
हरिश्चंद्र-रतनगड पाहू,
सह्याद्रीच्या कड्यावर, मेघांसवे जाऊ.
छ. संभाजीनगर जिल्ह्यात जाऊ,
दौलताबाद-अंतुरगड पाहू,
अजिंक्य अभेद्यतेची, गाथा ऐकू.
सातारा जिल्ह्यात जाऊ,
प्रतापगड-अजिंक्यतारा पाहू,
शौर्याची गाथा सांगणारा, वारा अनुभवू.
कोल्हापूर जिल्ह्यात जाऊ,
पन्हाळा-विशाळगड पाहू,
सिद्धीचा वेढा फोडणारी, पाऊले मोजू.
रायगड जिल्ह्यात जाऊ,
रायगड आणि जंजिरा पाहू,
स्वराज्याची राजधानी, नतमस्तक होऊ.
पालघर जिल्ह्यात जाऊ,
वसई आणि अर्नाळा पाहू,
सागराच्या लाटांवरचा, पराक्रम पाहू.
रत्नागिरी जिल्ह्यात जाऊ,
सुवर्णदुर्ग-जयगड पाहू,
अरबी समुद्राचा पहारेकरी, डोळा भरून पाहू.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊ,
देवगड-सिंधुदुर्ग पाहू,
शिवरायांच्या दूरदृष्टीला, सलाम करू.
धाराशिव जिल्ह्यात जाऊ,
नळदुर्ग-परांडा पाहू,
बहमनी आदिलशाहीचा, इतिहास उलगडू.
लातूर जिल्ह्यात जाऊ,
औसा आणि उदगीर पाहू,
महाराष्ट्राची माती, कपाळी लावू.
चला चला मित्रांनो, किल्ले पाहायला जाऊ,
महाराष्ट्राचा इतिहास, घराघरात पोहोचवू !
---------------------
लेखन / कवी :-
शंकर मुराबाई सिताराम चौरे
जि. प. प्राथमिक शाळा - गरताड गावठाण,
ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496
No comments:
Post a Comment