माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 29 November 2017

ऐकूया, सांगूया / म्हणूया.


                उपक्रम

कृती :-
१. शिक्षकांनी ऐकक वाक्य गटातील
     विद्यार्थ्यांना ऐकवावे. तेच वाक्य
      त्यांच्याकडून म्हणून घ्यावे.

२.शिक्षकांनी एकेक वाक्य एकेका विद्यार्थ्यास
    ऐकवावे. तेच वाक्य त्याच्याकडून म्हणवून
    घ्यावे.   
        
(१) घण् घण् घंटा वाजते
      मुले पट पट शाळेत येतात.

(२) ही आमची शाळा आहे.
      आम्हाला शाळा खूप आवडते.

(३) शाळेत आम्ही अभ्यास करतो.
     शाळेत आम्ही खूप खूप खेळतो.

(४) आम्ही सकाळी लवकर उठतो.
      दात स्वच्छ घासून तोंड धुतो.

(५)गावाजवळ ओढा आहे.
    ओढ्याजवळ खूप झाडे आहेत.

(६) टेकडीजवळ झरा आहे.
     झ-याचे पाणी खळखळ वाहते.

(७) पावसाळ्यात छत्री वापरतात.
     छत्रीमुळे आपण भिजत नाही.

(८)नारळाचे कवच टणक असते.
    नारळात गोड खोबरे व पाणी असते.

(९) फणस वरून काटेरी असतो.
     फणसाचे गरे गोड असतात.

(१०) डाळिंबाचे दाणे लाल असतात.
       डाळिंबाचे दाणे गोड असतात.

(११) चिंच आंबट असते.
        मुलांना चिंचा आवडतात.

(१२) केळी गोड असतात.
       केळ्यांचे शिकरण करतात.

(१३) ससा गवत खातो.
       ससा भित्रा असतो.
      पण तो चपळ असतो.

(१४) पोपट हा पक्षी आहे.
        पोपटाचा रंग हिरवा असतो.
       त्याची चोच लाल असते.

(१५) आमच्या गावात तलाव आहे.
       तलावात मासे आहेत.
       कासव आणि बेडूक आहेत.

(१६) शाळेची घंटा झाली.
        मुले मैदानावर आली.
        रांगेत उभी राहिली.
       राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा झाली.
       मुले परिपाठात रमली.

(१७) पोस्टमन थैली घेऊन आला.
       त्याने पत्रपेटीचे कुलूप उघडले.
   पोस्टमनने पत्रपेटीतील पत्रे थैलीत भरली.
   त्याने पत्रपेटीला कुलूप लावले.
   पोस्टमन थैली घेऊन पोस्टात गेला.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर
               ता.साक्री जि.धुळे
               ९४२२७३६७७५

Monday, 27 November 2017

थोडे आठवा ( म्हणजे काय ? )

(१)भूचर :--
-- जे प्राणी  जमिनीवर राहतात, त्यांना
   भूचर म्हणतात.  उदा. मांजर, कोल्हा.

(२)जलचर :--
-- जे प्राणी पाण्यात राहतात, त्यांना
   जलचर असे म्हणतात. उदा. मासा.

(३)उभयचर :--
-- जे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही
   ठिकाणी राहू शकतात,त्यांना 'उभयचर '
   म्हणतात.  उदा. बेडूक.

(४)वृक्ष :--
-- खूप उंच वाढणार्‍या टणक व मजबूत
   खोड असलेल्या वनस्पतींना वृक्ष
   म्हणतात.  उदा.  आंबा,  वड,  माड.

(५)झुडूप :--
-- टणक व मजबूत खोडाच्या; पण मध्यम
   उंची असलेल्या वनस्पतींना झुडूप
   म्हणतात.  उदा. संत्रे,  लिंबू, कण्हेर.

(६)वेल :--
-- कमकुवत खोड असणाऱ्या आणि
  आधाराने वाढणार्‍या वनस्पतींना
  वेली म्हणतात.  उदा. काकडी. भोपळा.

(७)रोपटी :--
-- मऊ आणि लवचिक खोड असलेल्या
  वनस्पतींना रोपटी म्हणतात. उदा. तुळस.

(८)वन :--
--एखाद्या प्रदेशात वृक्ष, झाडे- झुडपे, वेली,
  गवत इत्यादी निरनिराळ्या प्रकारच्या
  अनेक वनस्पती नैसर्गिकरीत्या वाढतात.
  अशा परस्परावलंबी समूहास 'वन'     
  म्हणतात.

(९)वन्यप्राणी :--
-- जे प्राणी निसर्गाच्या सान्निध्यात राहतात.
   आणि नैसर्गिक जीवन जगतात, त्यांना
   वन्यप्राणी म्हणतात. उदा. वाघ,कोल्हा .

(१०)शाकाहारी प्राणी :--
--- वनस्पतीजन्य पदार्थ खाऊन जे प्राणी
    आपली अन्नाची गरज भागवतात.
    त्यांना  ' शाकाहारी प्राणी ' म्हणतात.
    उदा. गाय, हरिण, बैल, गाढव. 

(११)मांसाहारी प्राणी :--
--- जे प्राणी इतर प्राण्यांचे मांस खाऊन
    आपली उपजीविका करतात, त्यांना
    'मांसाहारी ' प्राणी म्हणतात.
    उदा. सिंह , साप, घार, वाघ.

(१२)उभयाहरी प्राणी :--
--- जे प्राणी वनस्पतिजन्य पदार्थ त्याचप्रमाणे
     मांस खाऊन आपली अन्नाची गरज
     भागवतात, त्यांना ' उभयाहारी प्राणी '
    म्हणतात.  उदा. मानव, कुत्रा, मांजर.

     संकलक:-- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
                    जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                    ता.साक्री जि.धुळे
                    ९४२२७३६७७५

Sunday, 26 November 2017

ओळखा पाहू आम्ही कोण ?

(१) कधी हातावर, कधी भिंतीवर
         जाऊन मी बसतो
         तीन हात माझे सतत
         फिरवत मी असतो
         वेळ वाया घालवू नका
         असा नेहमी उपदेश करतो.
----------------------------------------------
(२) शर्टाच्या खिशावर
      रूबाबात बसतो
      काहीही लिहिण्यासाठी
      माझ्याशिवाय पर्याय नसतो .
-----------------------------------------------
(३) आम्हाला काय पायच नाय,
      वळवळ सळसळ करीत जाय
      हिस्स् फुस्सचा हिसका बसता
   धडकी भरेल, कराल काय ? आम्ही कोण ?
--------------------------------------------------
(४) लहानपणी हिरवा,
      चव माझी आंबट
      मोठेपणी पिवळा
      चव माझी गोड,
      मी तर आहे फळांचा राजा.
--------------------------------------------------
(५) आहे मी लवचिक खरी,
      कामे माझी कितीतरी
      कडू , गोड, आंबट, खारट,
      माझ्याविना नाहीच कळत.
----------------------------------------------
उत्तरे :- (१) घड्याळ, (२) पेन, (३) साप,
           (४) आंबा, (५) जीभ.
-----------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
               ता. साक्री जि.धुळे
                ९४२२७३६७७५
--------------------------------------------------