माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 19 October 2026

पक्ष्यांची माहिती ( मोर, पोपट, कावळा, कोंबडा, कोकीळ )

(१) मोर 

   मोर हा पक्षी फार सुंदर आणि डौलदार असतो. त्याची मान निळी व उंच असते. त्याच्या डोक्यावर छानदार तुरा असतो. पण त्याचे पाय कुरूप व उंच असतात. मोराचा पिसारा वजनदार व लांबलचक असतो. या पिसाऱ्यातील प्रत्येक पिसावर निळे, हिरवे, जांभळे, सोनेरी असे विविध रंग असतात. त्यामुळे प्रत्येक पिसावर डोळयाची आकृती तयार झालेली दिसते.
     मोर रानात राहतो. तो धान्यकण व कीटक खातो. तो फार उंच उडू शकत नाही. पावसाळी ढगांना पाहून मोर आपला पिसारा पसरतो आणि आनंदाने नाचू लागतो. नाचणारा मोर अतिशय विलोभनीय दिसतो.
      मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
==============================

(२) पोपट 

पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग हिरवागार असतो. त्याची चोच लालभडक, बाकदार व धारदार असते. त्याच्या गळयाभोवती काळी रेघ असते. त्याला कंठ म्हणतात.
       पोपटाच्या समुदायाला थवा असे म्हणतात. निळ्या आकाशात हिरवागार पोपट छान दिसतो. पोपट हिरव्यागार झाडात पटकन दिसत नाही. पोपट झाडाच्या ढोलीत राहतो. 
       पोपट हा खूप लोकांचा आवडता पाळीव पक्षी आहे. पोपटाला पिंजऱ्यात ठेवतात. पिंजऱ्यातील एका वाटीत त्याचे खाणे व एका वाटीत पाणी ठेवतात. पोपटाला पेरू, हिरवी मिरची व भिजलेली चण्याची डाळ आवडते, पिंजऱ्यात दांडीवर बसून झोके घेतो तेव्हा तो फार छान दिसतो. 'आपण शिकवू तसे पोपट बोलतो. हेच पोपटाचे वैशिष्ट्य आहे.
===============================

(३) कावळा 

     कावळा हा सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे. त्याचा रंग काळाकुट्ट असतो. मानेजवळचा भाग मात्र करडा असतो. त्याची चोच खूप मोठी असते. त्याचा आवाज कर्कश असतो. तो काव-काव असे ओरडतो. तो एखादया वस्तूकडे बघताना मान वाकडी करून बघतो. तो खूप चलाख असतो. बघता बघता तो एखादी वस्तू चोचीत उचलून नेतो.
     तो उंच झाडावर आपले घरटे बांधतो. तो अळया, किडे आणि जे इतर काय मिळेल ते खातो. तो घाणेरड्या वस्तूसुद्धा खातो. म्हणून त्याला साफसफाई करणारा पक्षी म्हणतात. एखादा कावळा मरून पडल्यास तेथे काव-काव करत अनेक कावळे एकत्र जमतात.
      लहान मुलांना हा पक्षी आवडतो. त्यांना झोपताना काऊच्या गोष्टी ऐकायला आवडते. 
=================================

(४) कोंबडा 

    कोंबडा हा पाळीव पक्षी आहे. तो फार उंच उडू शकत नाही. मुख्यतः तो चालतोच. त्याचे चालणे ऐटबाज असते. कोंबडे पांढऱ्या, काळया किंवा तपकिरी व मिश्र रंगांचे असतात. कोंबडचाची चोच टोकदार असते. पाय उंच असतात. त्याच्या डोक्यावर लालभडक तुरा असतो. चालताना हा तुरा डोलत असतो. म्हणून त्याला पक्ष्यांतील 'फौजदार' म्हणतात.
      तो दिवसभर इकडेतिकडे फिरत असतो. मातीतील धान्याचे कण व किडे हे त्याचे अन्न असते. रात्री त्याला टोपलीखाली किंवा खुराड्यात ठेवावे लागते. कोंबड्याच्या ओरडण्याला आरवणे असे म्हणतात.
      खेड्यांतील लोकांना कोंबड्याचा फार उपयोग होतो. पहाटे कोंबडा आरवला की लोक जागे होतात. म्हणूनच कोंबड्याला 'गरिबांचे घड्याळ' असे म्हणतात.
===============================

(५) कोकीळ 

कोकीळ हा मधुर आवाजाचा प्रसिद्ध पक्षी आहे. तो रंगाने काळा कुळकुळीत असतो. तो झाडावर राहतो. आंबराईत राहणे त्याला फार आवडते.
    कोकीळ बहुधा वसंत ऋतूमध्येच दिसतो. या काळात आंबराईमधून त्याचे गोड कुहू कुहूऽ नेहमी ऐकू येते. त्याचा मधुर आवाज उंच चढतो आणि दूरवर पसरतो. त्याचा आवाज ऐकू आला तरी प्रत्यक्ष तो पक्षी आपल्याला दिसेलच असे नाही. कारण तो झाडांच्या पानांत लपून बसलेला असतो. त्याच्या कर्णमधुर आवाजाने वातावरण धुंद होते.
     कोकिळा म्हणजे मादी पक्षी. ती पिंगट रंगाची असते. तिच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. तिचा आवाज मधुर नसतो. ती आळशी असते. स्वतःचे घरटे न बांधता ती आपली अंडी कावळयाच्या घरट्यात घालते.
================================
लेखन / संकलन :-  शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गरताड गावठाण 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
७७२१९४१४९६ / ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment